“रियाज” (Riyaz)

by Shekhar Jaiswal

Riyaz

‘Riyaz’ – वाईवरून पाचगणीकडे निघालो की वळणावळणाचा पसरणी घाट सुरु होतो . या घाटातून प्रवास करताना आजही मी भारावून जातो . मनातल्या मनात कितीतरी आठवणी जपल्यात या घाटाने . १२वी सायन्स शिकत असताना पास काढलेला असायचा . रोज पाचगणी -वाई एसटी ने प्रवास करायला लागायचा . हॅरिसन फॉली (थापा पॉईंट) संपला की पांडवगड ,मांढरदेवीचा डोंगर दिसू लागतो . आणि मग पसरणी , एकसर , कुसगाव , अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी केलेली भातशेती दिसायची . त्या भातशेतीत तुंबवलेले पाणी सुर्यप्रकाशामुळे चमकायचे व एक वेगळीच चित्रांची दृश्यमालीका दिसायला लागायची .आजही हा प्रवास करताना मला सृष्टीमध्ये हिरवागार नवचैतन्याचा बहर नेहमी फुललेला दिसून येतो .
चित्रकला महाविद्यालयात जाण्याचे ठरले होते आणि त्यासाठी इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा द्यावी लागते अशी माहीती मिळाली . त्या परिक्षेत A ग्रेड मिळाले तर कला महाविद्यालयात लगेच प्रवेश मिळतो असेही समजले . त्यामुळे मी वाईला केंद्र असलेल्या द्रविड हायस्कूलमध्ये प्रथमच आलो . प्रवेश करताना एका शाळेच्या शिपाईमामाने अष्टपुत्रेसरानां भेटायला सांगितले . इमारतीच्या शेवटच्या टोकाला एक जीना होता त्या जीन्यातुन गेलो की उजव्या बाजूला भलामोठा चित्रकला वर्ग होता .

Riyaz
Riyaz


अष्टपुत्रेसरांची काही निसर्गचित्रे त्या वर्गात लावलेली होती . वाईच्या घाटात जशी वडाची झाडे होती तशाच प्रकारे जलरंगातील ती चित्रे पाहून मी भारावलेल्या अवस्थेत अष्टपुत्रेसरांच्या पाया पडलो आणि त्यानां माझा कलामहाविद्यालयात जाण्याचा विचार सांगितला . अष्टपुत्रेसर मनापासून हसले आणि अगोदर ग्रेड परिक्षा द्या मग चित्रकार होण्याची स्वप्ने नंतर बघा अशी तंबी देऊन म्हणाले रियाज (Riyaz) करा , रियाज (Riyaz) करण्यावाचून गत्यंतर नाही . रियाज (Riyaz) करा . रियाज (Riyaz) करा .
मग मी रियाजाच्या मागे लागलो . रियाज (Riyaz) करायचा म्हणजे काय हे माहीत नव्हते .पण सतत चित्रे काढायची म्हणजे रियाज (Riyaz) करायचा एवढे ठरवून ग्रेड परिक्षा दिली आणि खरोखर A ग्रेड मिळाले . मग पुन्हा अष्टपुत्रेसरांच्या घरी जाऊन मार्गदर्शनासाठी पाया पडलो व निसर्गचित्रे कशी काढायची ते शिकवा अशी विनंती केली . मग अष्टपुत्रेसर पुन्हा हसले . शांतपणे म्हणाले ही माझी डायरी आहे आजची तारीख मी यामध्ये लिहून ठेवतो . आजपासून बरोबर एक वर्षाने म्हणजे 365 दिवसांनी तू मला भेट . रोज एक चित्रे काढायचं , त्या चित्राच्यापाठीमागे तारीख टाकायची अशी एक वर्षाची 365 चित्रे झाली की मला चित्रांचा गट्टा घेऊन भेटायला ये मग मी तुला निसर्गचित्रे कशी काढायची याचे मार्गदर्शन करतो . रियाज करा , रियाज करा, रियाजाशिवाय गत्यंतर नाही . खूप खूप शुभेच्छा ! असे सांगून त्यांनी बाहेर जाण्याचा दरवाजा दाखवला .
पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात आलो त्यावेळी विद्यार्थी सहाय्यक समिती या वसतिगृहात राहायचो . कमवा शिका योजना व अनेक अडचणीनां तोंड द्यावे लागायचे . पण रोज एक चित्र काढायचोच . त्यापाठीमागे तारीख लिहून ठेवायचो रोज डायरीत चित्र काढतानाचा अनुभव लिहून ठेवायचो . एक वर्ष झाल्यानंतर अष्टपुत्रेसरानां भेटायची ओढ लागली होती . कारण मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 365 चित्रे पूर्ण केली होती त्यानंतर ते मला निसर्गचित्रे काढायला शिकवणार होते .

Riyaz


विद्यार्थी सहाय्यक समिती या हॉस्टेलवर रहात असताना माझे पर्यवेक्षक तांबोळीसरांबरोबर काही गोष्टींमूळे मतभेद झाले व मी एकवर्षानंतर कायमस्वरूपी या वसतिगृहातून बाहेर पडलो . कॉलेजला मे महिन्याची सुट्टी लागली होती . वसतिगृह बंद झाले व मला पाचगणीला सर्व सामानाशिवाय परत जाणे एवढाच पर्याय शिल्लक राहीला. माझे सर्व सामान बांधून मी परत निघालो .
रिक्षाने स्वारगेट स्टेशनला आलो . त्याकाळी एसटीशिवाय पर्याय नव्हता . टॅक्सीने जाण्याची ऐपत नव्हती . स्वारगेट स्टेशनला प्लॅटफार्मवर आलो तर तोबा गर्दी . मे महिन्यात उन्हाळी सिझन सुरु झाल्याने सर्व गाड्या पुणे स्टेशनवरूनच भरून यायच्या त्यामूळे तीन चार गाड्या सोडल्या . शेवटी संध्याकाळची शेवटची गाडी आली . तोपर्यंत एका हमालाला सांगून चित्राच्या फाईली व माझ्या सर्व बॅगा टपावर नीट व्यवस्थित बांधण्यासाठी पैसे ठरवले . त्यासाठी त्याची हमाली अगोदरच दिली .एसटी आल्यानंतर घाईने गर्दीत घुसलो पण बसायला काय उभे राहण्यासाठीसुद्धा जागा नव्हती . हळूहळू प्रवास करत एसटी वाई स्टेशनला आली आणि मग बसायला जागा मिळाली .


वाई ते पाचगणी घाटातून जाताना मी प्रवासात खूप खूष झालो होतो . बसायला खिडकीशेजारी जागा मिळाली होती . घाटातील वनश्री , झाडे , छोट्या छोट्या तुकड्यांची शेती , पांडवगड व थंडगार भन्नाट वेगाने वाहणारा वारा मनाला सुखावत होता . वाऱ्याच्या उलट्या दिशेने एसटी वेगाने चालली होती , बुवासाहेबाचे मंदीर पार करून आता नागेवाडीच्या १६ नंबर स्टॉपवर एसटी थांबणार होती ,पण या स्टॉपवर बस थांबायच्या अगोदरच एसटी अचानक थांबवली होती . एसटीचा ड्रायव्हर गाडी थांबवून खाली उतरून आकाशाच्या दिशेने पहात होता . आकाशात हजारो कागद पक्षांप्रमाणे हळुवारपणे तरंगत तरंगत पसरणीच्या खोल दरीत उडत चालले होते व ते एसटीच्या टपावरून उडत होते .

Riyaz
Ninad Chaudhari’s photo

क्षणार्धात माझी तंद्री भंग पावली व सगळा प्रकार माझ्या लक्षात आला . भराभर धावत वेगाने खाली उतरून मी एसटीच्या टपावर चढलो . माझ्या सामानाच्या बॅगा वजनदार असल्याने तशाच होत्या पण चित्रांच्या पोर्टपोलीओच्या फाईली बांधायला काही नसल्याने हमालाने त्या फाईलीच्या दोऱ्या एसटीच्या ग्रिलला बांधल्या होत्या . वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे दोऱ्या तुटल्या होत्या व फाईलींमध्ये हवा भरून सर्व चित्रे फडफडत वेगाने घाटाच्या खोल खोल दरीमध्ये उंचउंच उडत होती . दरीमध्ये उतरून चित्र गोळा करणे शक्य नव्हते . शिवाय एसटीमध्ये बसलेली माणसे उशीर होत असल्याने वैतागली होती . आरडाओरड करू लागली होती . मी खाली उतरून एसटीत आल्यानंतर आतमध्ये प्रत्येकजण विचारत होता काय झाले ? काय झाले ?
काय सांगू त्यांना ? माझा रियाज (Riyaz) , 365 दिवसांची दिवसरात्र जागून केलेली मेहनत व हजारो स्केचेस , निसर्गचित्रे , असाईनमेंटस क्षणार्धात माझ्याच डोळ्यांसमोर पसरणीघाटाच्या दरीत दिसेनासी झाली होती . रियाज करा , रियाज करा रियाजाशिवाय गत्यंतर नाही असे सांगणारे अष्टपुत्रेसर पाणवलेल्या डोळ्यांसमोर धुसर दिसू लागले .आता काय सांगणार त्यानां ? कोणता रियाज दाखवणार आता ? आता एसटीचा उरलेला प्रवास आवडेनासा झाला . खूप खूप राग आला स्वतःचा , नियतीचा , हतबल परिस्थितीचा ,त्यानंतर खरोखरच खूप रियाज केला . त्यानंतर चार वर्ष अष्टपुत्रेसरानां भेटलोच नाही .अथक परिश्रमाने आर्थिक परिस्थिती बदलली . त्यानंतर 1996 साली स्वत:ची चारचाकी गाडी घेतली . एसटीने प्रवास करून आता सत्तावीस वर्षे झाली असावीत .

Riyaz
Image by Freepik

परवा वाईवरून स्वतःच्याच गाडीने पाचगणीला जात होतो . स्वच्छ हवा होती , डोंगरदऱ्या , पांडवगड , पसरणी , कुसगाव , एकसर गावातली शेती हिरवीगार दिसत होती . पाणी साठल्याने चमकत होती , मस्त थंडगार बेभान वारा सुटला होता . त्या एसटीच्या स्पॉटवरच , त्याच जागेवरच मुद्दाम थोडावेळ थांबलो होतो . वर आकाशात असंख्य पक्षी दरीच्या दिशेने वेगाने उडत चालले होते . ते उडत चाललेले पक्षी जणू मला माझ्या दरीत झेपावलेल्या चित्रांसारखे वाटत होते .

Riyaz
Riyaz


माझा रियाज वाया गेला नव्हता .
रियाज कधीच वाया जात नाही .
प्रत्येक रियाज नव्याने काहीतरी शिकवत असतो .
निसर्ग हाच खरा सर्वश्रेष्ठ कलाकार त्याच्याकडचे रंग , विविधता , दृश्य बदलण्याची तत्परता आपल्याकडे कशी असणार ? म्हणून त्याने माझी असंख्य चित्रे मला रियाजाचा गर्व होऊ नये म्हणून स्वतःकडे घाटाच्या दरीत ओढून घेतली व मला मुक्त केला . एक नवा विचार दिला . रियाज हा प्रत्यक्ष कृतीने करण्याची गोष्ट नसते रियाज सतत मनन , चिंतन करूनही करता येतो ही नवी दृष्टी निसर्गाने दिली . निसर्गापुढे मी नतमस्तक झालो आणि …..
अचानक दरीमधून मला मोठ्याने अष्टपुत्रेसरांचा इकोसारखा घुमणारा आवाज ऐकू येऊ लागला . मित्रांनो क्षेत्र कोणतेही असू द्या .
रियाज करा ,
रियाज करा ,
सतत रियाजाशिवाय गत्यंतर नाही .

जेष्ठ चित्रकार
सुनिल काळे सर,पाचगणी


थोडक्यात, “रियाझ” ही समर्पणाची, चिकाटीची आणि शिक्षण आणि कलांमध्ये उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची कथा आहे. हे नियमित सराव आणि एखाद्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अटूट वचनबद्धतेच्या महत्त्वावर जोर देते. कथन त्यांच्या शैक्षणिक आणि कलात्मक प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी प्रेरणा स्त्रोत आहे, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमांचे बक्षीस प्रदर्शित करते.


या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास प्रोत्साहन मिळते.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Leave a Comment